
Trust & Safety
तुमचा फोन हरवला आहे? तुमच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी पुढील पावले उचला
nidhiswadi|4 min read|03 July, 2025
रात्र झाली आहे. घड्याळात 11 वाजले आहेत. तुमच्या मित्राने तुम्हाला घरी सोडले आहे. तुम्ही दरवाजा उघडण्यासाठी खिशात हात घालता आणि लक्षात येते, फोन खिशात नाही! काळजात धस्स होते.
तुम्ही गोंधळून जाता. फोन कुठे गेला हे नीट आठवत नाही आहे. कदाचित थिएटरमध्ये विसरलात? कदाचित खरेदी करताना पडला? की कुणी तरी खिशातूनच काढून घेतला?
डोक्यात फक्त एकच विचार – फोनमध्ये असलेला सगळा डेटा, लॉगइन केलेले पेमेंट आणि बँकिंग अॅप्स, आणि कदाचित नोट्स अॅपमध्ये सेव्ह करून ठेवलेले पासवर्ड.
भीती वाटणे साहजिकच आहे. कारण पुढची काही मिनिटे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत.
मोबाइल चोरीमागचे तथ्य
आजचा स्मार्टफोन हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही. तेच तुमचे वॉलेट आहे, तुमचे बँक खाते आहे, आणि तुमची ओळखसुद्धा. हे चोरट्यांनाही माहिती आहे. त्यांना केवळ फोन विकून काही पैसे मिळवायचे नसतात, तर एकदा फोन अनलॉक झाला, की त्यांना बऱ्याच गोष्टींचा ॲक्सेस मिळणार आहे, हे त्यांना माहीत असते.
डिव्हाइस चोरीला गेल्यानंतर आर्थिक फसवणुकीचे प्रकार कसे घडतात आणि तुम्ही त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता, हे या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.
डिव्हाइस चोरीला गेल्यानंतर आर्थिक फसवणुकीचे प्रकार कसे घडतात
डिव्हाइस चोरीला गेल्यानंतर आधुनिक डिजिटल इकोसिस्टिममधील कमकुवत दुवे शोधून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडतात. भामटे पुढील काही बाबींचा गैरफायदा घेतात :
- ऑटो-लॉगिन केलेली पेमेंट अॅप म्हणजे UPI, डिजिटल वॉलेट किंवा बँकिंग अॅप्ससारख्या ॲपमुळे चोरट्यांना आयती संधी मिळते. फोनमध्ये भक्कम स्क्रीन लॉक नसेल किंवा अॅपसाठी बायोमेट्रिक किंवा पिनसारखे स्वतंत्र सुरक्षा पर्याय नसतील, तर ही अॅप्स रिऑथेन्टिकेशन न करता थेट व्यवहार सुरू करण्याची मुभा देतात.
- सेव्ह केलेले कार्ड तपशील : काही लोक आपले कार्ड डिटेल्स (कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट) ब्राउझर किंवा अॅपमध्ये सेव्ह करून ठेवतात. जर फोन योग्य प्रकारे लॉक केला नसेल, तर चोरट्यांना या कार्ड तपशीलांचा वापर करून खरेदी करता येऊ शकते.
- कमकुवत स्क्रीन लॉक किंवा स्क्रीन लॉकच नसल्यास चोरट्यांना फोन सहज उघडता येतो. या शिवाय अॅपसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था नसेल, तर संवेदनशील अॅप्सचा वापर होण्याची शक्यता जास्त असते.
- या व्यतिरिक्त, चोरटे टेलिकॉम कंपन्यांना गंडवून सिम स्वॅप ॲटॅक करू शकतात. म्हणजे पीडित व्यक्तीचा मोबाईल नंबर नवीन सिमवर ट्रान्सफर करून, व्यवहार तपासणीसाठी येणारे OTP स्वतःकडे घेऊ शकतात. या प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही हा ब्लॉग वाचू शकता.
- फिशिंग हल्ले हा आणखी एक सामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. यात भामटे चोरलेल्या डिव्हाइसचा वापर करून पीडित व्यक्तीचे कॉन्टॅक्ट्स किंवा ईमेल ॲक्सेस करतात आणि त्यांच्या नावे खोटे संदेश पाठवून इतरांकडून संवेदनशील माहिती किंवा पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. फिशिंगबद्दल अधिक समजून घेण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग वाचू शकता.
या पद्धतींमध्ये तांत्रिक व मानवी कमकुवतपणाचा फायदा घेतला जातो. त्यामुळे डिव्हाइसची चोरी ही मोठ्या आर्थिक नुकसानासाठी कारणीभूत ठरू शकते.
‘अँटी-थेफ्ट’ उपायांची माहिती असणे का महत्त्वाचे आहे?
‘अँटी-थेफ्ट’ उपायांची माहिती असणे का महत्त्वाचे आहे?भारतामध्ये सध्या डिव्हाइस चोरीनंतर होणाऱ्या आर्थिक फसवणुकींच्या घटना वेगाने वाढत आहेत. कमकुवत स्क्रीन लॉक, फार लक्ष न दिली जाणारी अकाउंट्स यासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी अँटी-थेफ्ट उपाय माहीत असणे आणि ते योग्य वेळी अमलात आणणे युजरसाठी खूप महत्त्वाचे ठरते. यामुळे तुमचे डिव्हाइस सुरक्षित राहतेच, त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान होण्याचा धोका कमी होतो आणि गरज पडल्यास तुम्ही वेळीच योग्य कृती करू शकता. त्यामुळे तुमचे डिजिटल आणि आर्थिक आयुष्य अधिक सुरक्षित होण्याची सुनिश्चिती होईल.
तुमचे डिव्हाइस कसे संरक्षित ठेवाल
डिव्हाइस चोरीला गेल्यानंतर तुमच्या आर्थिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब करा :
- भक्कम लॉक वापरा : तुमचे डिव्हाइस भक्कम पासवर्ड, बायोमेट्रिक सुरक्षा (फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन) यांसारख्या सुरक्षित पद्धतीने लॉक करा. फोन काही वेळ वापरला न गेल्यास ऑटो-लॉक सुरू होईल याची खात्री करा. ‘1234’ सारखे सोपे आणि अंदाज येणारे पिन ठेवू नका.
- अॅप-लेव्हल लॉक सेट करा : बँकिंग किंवा पेमेंट अॅप्समध्ये स्वतंत्र पिन किंवा बायोमेट्रिक सुरक्षा वापरा. उदाहरणार्थ, PhonePe अॅपमध्ये प्रोफाइल > सिक्युरिटी > बायोमेट्रिक आणि स्क्रीन लॉक या पर्यायाद्वारे अॅपसाठी अतिरिक्त सुरक्षा सेट करता येते. यामुळे फोन अनलॉक झाला तरी अॅप सुरक्षित राहते.
- महत्त्वाची माहिती ऑटो-सेव्ह होऊ देऊ नका : ब्राउझर किंवा अॅपमध्ये कार्ड डिटेल्स किंवा UPI ID एन्क्रिप्शनशिवाय सेव्ह करू नका. माहिती सुरक्षित साठवण्यासाठी विश्वासार्ह पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
- रिमोट ट्रॅकिंग आणि डेटा वाइपिंग सुरू ठेवा : तुमचे डिव्हाइस हरवल्यास ते शोधता यावे आणि गरज पडल्यास डेटा डिलीट करता यावा यासाठी अँड्रॉइड युजरनी Find My Device आणि आयओएस युजरनी Find My iPhone ही सुविधा सक्रिय ठेवावी.
- सॉफ्टवेअर अपडेट करत राहा : तुमच्या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टीम आणि अॅप्स नियमितपणे अपडेट करा. यामुळे सुरक्षेशी संबंधित त्रुटी दूर केल्या जातात आणि डिव्हाइस अधिक सुरक्षित राहते.
- फोन हरवल्यावर तातडीने कळवा : डिव्हाइस हरवल्यास तुमच्या टेलिकॉम प्रदात्याशी संपर्क साधून सिम कार्ड बंद करा. तसेच बँक किंवा वॉलेट प्रदात्यांना तात्काळ माहिती द्या आणि खाते तात्पुरते सस्पेंड करण्याची विनंती करा.
- बँक खात्यांवर लक्ष ठेवा : व्यवहारांसाठी एसएमएस किंवा ईमेल अलर्ट सुरू ठेवा आणि दररोज खात्याची तपासणी करा. कुठलाही अनधिकृत व्यवहार दिसल्यास बँकेला तात्काळ कळवा.
- डिव्हाइस बाइंडिंग फिचर वापरा : फोनपे, गुगल पे यांसारख्या UPI अॅप्समध्ये डिव्हाइस बाइंडिंग सुरू ठेवा, म्हणजे सिम स्वॅप झाल्यावर देखील पुन्हा व्हेरिफिकेशन आवश्यक असेल आणि सुरक्षितता अबाधित राहील.
PhonePe खाते तात्पुरते ब्लॉक कसे करावे आणि नंतर पुन्हा ॲक्सेस कसा मिळवावा
तुमचे डिव्हाइस चोरीला गेले असेल, तर अनधिकृत ॲक्सेस रोखण्यासाठी तुमचे PhonePe खाते तात्काळ ब्लॉक करा :
- खाते ब्लॉक करण्याचे मार्ग :
- कस्टमर केअरद्वारे : PhonePe सपोर्टवर 80-68727374 किंवा 022-68727374 या क्रमांकांवर कॉल करून चोरीची माहिती द्या आणि खाते तात्पुरते ब्लॉक करण्याची विनंती करा.
- वेब फॉर्मद्वारे : Phonepe सपोर्ट फॉर्मवर तिकीट सबमिट करा आणि समस्येची संपूर्ण माहिती भरा.
- सोशल मीडियाद्वारे : ट्विटरवर @PhonePeSupport किंवा फेसबुकवर OfficialPhonePe या हँडलवर संपर्क करून घटनेची माहिती द्या.
- सायबर क्राईम सेलद्वारे : फसवणुकीचा संशय असल्यास cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा किंवा 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
- खात्याचा ॲक्सेस पुन्हा मिळवण्यासाठी:
- PhonePe सपोर्टशी संपर्क साधा: नवीन डिव्हाइस किंवा सिम मिळाल्यावर PhonePe कस्टमर सपोर्टला कॉल करा किंवा वेबफॉर्मद्वारे संपर्क साधा. आपली ओळख पटवण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर, ईमेल किंवा KYC माहिती द्यावी लागेल.
- खाते पुन्हा व्हेरिफाय करा: फोनपेने दिलेल्या सूचनांनुसार नवीन डिव्हाइसवर तुमचं खाते पुन्हा लिंक करा. यामध्ये OTP पडताळणी किंवा KYC पुन्हा सबमिट करणे आवश्यक असू शकते.
- व्यवहार तपासा : खात्याचा ॲक्सेस पुन्हा मिळाल्यावर PhonePe अॅपमध्ये मदत > जुने व्यवहार यावर क्लिक करून सर्व व्यवहार तपासा. कोणताही अनधिकृत व्यवहार आढळल्यास मदत > व्यवहाराबद्दल समस्या आहे, यावर क्लिक करून तात्काळ रिपोर्ट करा.
- तक्रार निवारण: जर काही समस्या कायम राहिल्या, तर grievance.phonepe.com या वेबसाइटवर लॉग इन करून तुमच्या तिकीट आयडीसह तक्रार पुढे पाठवा.

बोनस स्रोत
- फसवणूकीचे इतर प्रकार आणि त्यापासून संरक्षित कसे राहावे या संदर्भात येथे वाचा.
- फसवणूक कशा प्रकारे होते आणि आमच्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही काय उपाययोजना करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या ट्रस्ट अँड सेफ्टी विभागप्रमुखांनी माहिती दिली आहे : येथे पाहा.
तुम्हाला अशा स्कॅमचा फटका बसला असेल तर तक्रार कशी करावी
जर PhonePe द्वारे फसवणूक झाली असेल, तर खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून तक्रार नोंदवा:
- PhonePe अॅप मदत सेक्शनमध्ये जाऊन “व्यवहारात समस्या आहे” या पर्यायाखाली तक्रार नोंदवा
- PhonePe ग्राहक सेवा क्रमांक: 80–68727374 / 022–68727374 वर कॉल करून तक्रार नोंदवा
- वेबफॉर्म सबमिशन: https://support.phonepe.com/ येथे फॉर्म भरून तक्रार करा
- सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकता.
- Twitter — https://twitter.com/PhonePeSupport
- Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe
- ग्रेसिव्हन्स पोर्टल: https://grievance.phonepe.com/ येथे लॉगिन करून आधीच्या तक्रारीसंदर्भात तक्रार नोंदवा
- सायबर क्राईम: जवळच्या सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करा किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन नोंदणी करा किंवा हेल्पलाइन 1930 वर कॉल करा
महत्त्वाची सूचना— PhonePe तुम्हाला कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. ज्या ई-मेल phonepe.com डोमेन वरून आलेल्या नाहीत अशा सर्व PhonePe पासून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
Author
