PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

तुमच्या कुटुंबाला सायबर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 4 महत्त्वाच्या पायऱ्या

PhonePe Regional|3 min read|20 January, 2026

URL copied to clipboard

आजच्या काळात कोणत्याही कार्यक्रमात किंवा चारचौघात फसवणुकीचा  विषय काढा, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एखादी गोष्ट नक्कीच असते. आपल्या माहितीत असे एखादे काकू किंवा काका नक्कीच असतात ज्यांचे पैसे गेले आहेत किंवा ज्यांना एखादा संशयास्पद फोन कॉल आला होता, पण त्यांनी तो लगेच ओळखून कट केला.

हे आजचे वास्तव आहे. असे असले तरी, रेग्युलेटर्स, कायदा अंमलबजावणी संस्था आणि इतर महत्त्वाच्या संस्थांच्या सततच्या प्रयत्नांमुळे, या वर्षी फसवणुकीला आळा घालण्यात आपण प्रगती केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 24 मध्ये भारतात 13.42 लाख UPI फसवणुकीच्या घटना घडल्या, ज्यांची रक्कम ₹1,087 कोटी होती. आर्थिक वर्ष 25 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 12.64 लाख घटना आणि ₹981 कोटींवर आले आहे.

ही गती अशीच कायम ठेवण्यासाठी, आम्ही या वर्षाची सुरुवात एका सविस्तर मार्गदर्शनासह करत आहोत, जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.

1. धोका समजून घ्या

डिजिटल फसवणुकीमध्ये फिशिंग, आयडेंटिटी थेफ्ट (ओळख चोरी) आणि तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर टाकणे यांसारख्या विविध तंत्रांचा समावेश असतो. स्कॅमर्स दिशाभूल करणारी माध्यमे जसे की खोटे ईमेल्स, मेसेजेस आणि फोन कॉल्सचा वापर करून लोकांना पासवर्ड किंवा बँकिंग तपशीलांसारखी संवेदनशील माहिती देण्यासाठी फसवतात.

2. सामान्य स्कॅम्स ओळखा

काही फसवणुकीच्या पद्धती खूप जुन्या आणि प्रसिद्ध आहेत, तर काही तुलनेने नवीन आहेत. मात्र, या सर्व पद्धतींमध्ये एक समानता असते – स्कॅमची सुरुवात अनेकदा एखादा धोकादायक फोन कॉल, मेसेज किंवा ईमेलने होते. तुमच्या कुटुंबाला अशा अनपेक्षित संभाषणांबाबत सावध आणि सतर्क राहायला शिकवा.

या धोक्याच्या चिन्हांकडे लक्ष द्या:

  • तात्काळ कृतीचा दबाव किंवा धमकावणे: स्कॅमर्स तुम्हाला विचार करायला वेळ न देता घाईघाईने कृती करायला भाग पाडण्यासाठी भीती निर्माण करतात.
  • संवेदनशील माहितीची मागणी: कोणतीही अधिकृत संस्था तुम्हाला कधीही पासवर्ड, CVV किंवा OTP मागत नाही.
  • संशयास्पद लिंक्स: लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिचा URL तपासा की तो खरोखरच बँकेचा किंवा संस्थेचा आहे का. क्लिक करण्यापूर्वी तुम्ही लिंकवर कर्सर नेऊन  ती कुठे जाते हे पाहू शकता.
  • पोलीस किंवा तुमची बँक तुम्हाला कधीही पैसे काढायला, तुमचा पूर्ण पिन सांगायला किंवा फिंगरप्रिंट चेकिंग साठी रोख रक्कम द्यायला सांगणार नाही.
  • फोन स्कॅम्स: जर कॉलर अटकेची धमकी देत असेल किंवा कॅश ट्रान्सफरद्वारे दंड मागत असेल, तर तो स्कॅम आहे. अनपेक्षित कॉल्स कमी करण्यासाठी ‘टेलिफोन प्रेफरन्स सर्व्हिस’ (DND) मध्ये नोंदणी करा.
  • घरी येणारे अनोळखी लोक : सेवा देण्यासाठी घरी आलेल्या अनपेक्षित व्यक्तींना नाही, नको आहे म्हणणे पूर्णपणे योग्य आहे. कोणत्याही सेवेसाठी जागेवरच सही करू नका, नेहमी अनेक ठिकाणांहून माहिती घ्या. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय आपली वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. फसवणूक करणारे  या माहितीचा वापर करून नवीन ओळख तयार करू शकतात किंवा तुमचा पासवर्ड हॅक करू शकतात.

3. तुमचे अकाउंट आणि डिव्हाइस सुरक्षित करा

  • मजबूत पासवर्ड: प्रत्येक अकाउंटसाठी अक्षरे, अंक आणि सिम्बल  यांचे युनिक कॉम्बिनेशन असलेला पासवर्ड वापरा.
  • मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन : सुरक्षेचा अतिरिक्त थर म्हणून जिथे शक्य असेल तिथे मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा.
  • ऑटोमॅटिक अपडेट्स: सुरक्षा त्रुटी  भरून काढण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्स नेहमी अपडेट ठेवा.
  • नियमित बॅकअप: महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप दर महिन्याला एखाद्या एक्स्टर्नल ड्राइव्हवर किंवा विश्वासार्ह क्लाउड सर्व्हिसवर ठेवा.
  • अँटीव्हायरस/मालवेअर प्रोटेक्शन: नियमितपणे प्रभावी मालवेअर/अँटीव्हायरस तपासणी  करा.

जर तुम्हाला शंका असेल की तुमची माहिती लीक झाली आहे, तर फसवणुकीची तक्रार त्वरित करा.

4. पुढच्या पिढीला सक्षम करा

लहान मुलांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील गोष्टींबद्दल त्यांच्याशी नियमितपणे बोला:

  • प्रायव्हसी : त्यांनी वैयक्तिक माहिती का शेअर करू नये किंवा चॅटमध्ये अनोळखी व्यक्तींशी का बोलू नये.
  • पॅरेंटल कंट्रोल्स : अयोग्य साइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि स्क्रीन टाइमची योग्य मर्यादा सेट करण्यासाठी टूल्स वापरा.
  • मोकळा संवाद: जर त्यांना ऑनलाइन काहीतरी विचित्र किंवा चुकीचे वाटले, तर त्यांनी घाबरता त्वरित तुमच्याकडे यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.
  • नियंत्रण नको, सक्षमीकरण: मुलांवर फक्त बंधने घालण्याऐवजी त्यांना डिजिटल जग समजून घेण्यास मदत करा.
  • फॅमिली कोड वर्ड : AI स्कॅमर्सच्या युगात, कुटुंबात एक सामायिक कोड वर्ड असणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून AI चा वापर करून कोणीही तुमची भावनिक किंवा आर्थिक फसवणूक करू शकणार नाही.

तक्रार कशी करावी

जर तुम्हाला शंका असेल की तुम्ही स्कॅमचे शिकार झाला आहात, तर त्वरित तक्रार करा:

PhonePe वर रिपोर्ट करणे:

  • PhonePe ॲप: मदत  सेक्शनमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
  • PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग:
  • तक्रार निवारण: PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा.

अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:

  • सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधेद्वारे करा.

सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करणे

डिजिटल सुरक्षा ही एक सर्वांची जबाबदारी आहे. सतर्क राहून, मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास न ठेवता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना सुरक्षित ठेवू शकता आणि सर्वांसाठी एक सुरक्षित डिजिटल इकोसिस्टम तयार करण्यात योगदान देऊ शकता.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading