
Trust & Safety
बनावट ॲप्स आणि APK स्कॅमपासून सुरक्षित कसे राहायचे
PhonePe Regional|3 min read|17 December, 2025
आजकाल आपले स्मार्टफोन आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात—पेमेंट, बँकिंग ॲप्स, ओळखपत्रे, कामाची साधने आणि खासगी बोलणे—सर्वकाही एकाच डिव्हाइसवर असते. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी एकाच डिव्हाइसवर असल्याने, सायबर गुन्हेगार बनावट ॲप्स आणि वाईट हेतूने APK फाईल्सचा गैरफायदा घेतात यात नवल नाही.
हे स्कॅम्स अगदी क्षुल्लक गोष्टीने सुरू होतात: व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर आलेली एखादी लिंक, मिस झालेल्या ट्रॅफिक चलनबद्दलचा SMS, किंवा OTT सबस्क्रिप्शनसारख्या प्रीमियम सेवेसाठी “विनामूल्य अपग्रेड”ची ऑफर देणारा मेसेज. फक्त एका टॅपमुळे तुमच्या फोनचा ताबा अनोळखी व्यक्तीच्या हाती जाऊ शकतो.
APK डाऊनलोड धोकादायक का आहेत?
APK (अँड्रॉइड पॅकेज फाइल) तुम्हाला Indus Appstore, Google Play Store आणि Apple App Store सारख्या अधिकृत ॲप स्टोअर व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून ॲप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी देतात. काही वेळा ही फाईल वैध कारणांसाठी वापरली जात असली तरी, ती अधिकृत ॲप स्टोअर्सवरील सुरक्षा तपासण्यांना बगल देते.
स्कॅम कसा चालतो?
सामान्यतः, फसवेगिरी करणारे खालील क्रमाने काम करतात:
- फसवेगिरी करणारा तुम्हाला बक्षीस, कर्ज किंवा दंड माफ करण्याची बतावणी करून SMS किंवा लिंक पाठवतो.
- ती लिंक तुम्हाला अधिकृत ॲप स्टोअरवर न नेता थेट बनावट ॲपची APK फाईल डाऊनलोड करण्यासाठी नेते.
- तुम्हाला अवाजवी परवानग्या मागितल्या जातात (उदा. SMS, संपर्क, ॲक्सेसिबिलिटी, नोटिफिकेशन, इत्यादी).
- बनावट ॲप एकतर काहीही काम करत नाही किंवा क्रॅश होते—पण मालवेअर मात्र शांतपणे बँकग्राउंड वर सुरू राहते.
- पडद्यामागे काय चालते: OTP अडवणे, स्क्रीन-ओव्हरले हल्ले, बँकिंग ॲक्सेस मिळवणे, महत्त्वाच्या नोटिफिकेशन डिलीट करणे.
अनधिकृत व्यवहार झाल्यावर किंवा खाते रिकामे झाल्यावरच वापरकर्त्याला याबद्दल समजते.
हा धोका किती मोठा आहे?
2024 मध्ये, भारतात सुमारे 36 लाख सायबर-फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या असून अंदाजित ₹22,845 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नोंदवलेल्या सायबरसुरक्षा घटना 2022 मधील सुमारे 10.29 लाखांवरून 2024 मध्ये सुमारे 22.68 लाख** पर्यंत दुप्पट झाल्या आहेत.*
कोणाला जास्त धोका आहे?
कोणालाही लक्ष्य केले जाऊ शकते, परंतु खालील वापरकर्ते सामान्यतः जास्त शिकार होतात:
- जे व्यावसायिक अनेक ॲप्स वापरतात आणि वारंवार व्यवहार करतात.
- वृद्ध किंवा कमी तंत्रज्ञान-समजूतदार वापरकर्ते जे अधिकृत दिसणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवतात.
- “विनामूल्य” ॲप्स किंवा गेम अपग्रेड्ससाठी स्रोत न तपासणारे तरुण वापरकर्ते.
लक्ष देण्यासारखी धोक्याची चिन्हे
- Indus Appstore सारख्या अधिकृत ॲप स्टोअरऐवजी SMS, व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही थर्ड-पार्टी ॲपद्वारे डाऊनलोड लिंक पाठवणे.
- ॲपद्वारे त्याच्या कामाशी न जुळणाऱ्या परवानग्यांची मागणी करणे (उदा. टॉर्च ॲप SMS ॲप ॲक्सेस करण्याची परवानगी मागत असल्यास).
- डेव्हलपरचे नाव चुकीचे, नवीन किंवा संशयास्पद दिसणे.
- खूपच आकर्षक वाटणाऱ्या ऑफर किंवा मेसेज (उदा. “विनामूल्य प्रीमियम”, “त्वरित कर्ज मंजुरी”, लग्नपत्रिका, इत्यादी).
- ॲपचे डाऊनलोड कमी असणे, सामान्य ब्रँडिंग असणे किंवा खराब रिव्ह्यू असणे.
स्वतःचे संरक्षण कसे करावे?
- अधिकृत स्टोअरमधूनच (Indus App Store/ Google Play/ Apple App Store) ॲप्स इन्स्टॉल करा.
- “अनोळखी ॲप्स इन्स्टॉल करा” ही सेटिंग्ज बंद ठेवा, जोपर्यंत तुम्हाला नक्की काय डाऊनलोड करत आहात हे पूर्णपणे माहिती नसते.
- चलन, रिफंड, रिवॉर्ड्स किंवा कर्ज यासंबंधी अनपेक्षितपणे आलेल्या लिंक्स/फाईल्सवर टॅप करणे टाळा.
- ॲप्सद्वारे मागितलेल्या परवानग्या काळजीपूर्वक तपासा आणि नंतरच त्यांना परवानगी द्या.
- नुकसानकारक कृती तपासण्यासाठी विश्वासार्ह मोबाइल सुरक्षा ॲप वापरा.
बनावट ॲप इन्स्टॉल केल्यास काय करावे?
- ते ॲप त्वरित अनइन्स्टॉल करा.
- तात्काळ मोबाइल डेटा आणि वाय-फाय बंद करा.
- बँकिंग, ईमेल आणि पेमेंट ॲप्सचे पासवर्ड बदला.
- निगरानी सुरू करण्यासाठी किंवा ॲक्टिव्हिटी फ्रीज करण्यासाठी तुमच्या बँक/पेमेंट सेवा प्रदात्याशी संपर्क साधा.
फसवणुकीची तक्रार कशी करावी?
तुम्ही फसवणुकीचे लक्ष्य बनले आहात असा संशय असल्यास, त्वरित तक्रार करा:
PhonePe ॲपवर तक्रार करणे:
- PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि तक्रार नोंदवा.
- PhonePe ग्राहक सेवा: 80-68727374 / 022-68727374 या क्रमांकावर कॉल करा.
- सोशल मीडियावर तक्रार:
- Twitter: PhonePe Support
- Facebook: PhonePe Official
- तक्रार निवारण: PhonePe तक्रार पोर्टल वर तक्रार नोंदवा.
सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे:
- सायबर क्राइम सेल: सायबर क्राइम पोर्टल वर ऑनलाइन तक्रार करा किंवा 1930 वर कॉल करा.
- दूरसंचार विभाग (DOT): संचार साथी पोर्टल वरील ‘चक्षु’ सुविधेद्वारे संशयास्पद मेसेज, कॉल्स किंवा व्हॉट्सॲप/टेलिग्राम फसवणुकीची तक्रार करा.
अंतिम सूचना
डिजिटल पेमेंट्स आणि ॲप्स सावधगिरीने वापरल्यास सुरक्षित आहेत. APK/बनावट ॲप-आधारित फसवणूक होण्याचे मुख्य कारण म्हणजे भीती किंवा उत्साहामुळे आपण योग्य पडताळणी न करता घाईघाईने कृती करतो. मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ॲपचा स्रोत, डेव्हलपरचा ईमेल, मागितलेल्या परवानग्या आणि कोणत्याही लिंकची सत्यता तपासण्यासाठी एक क्षण थांबा. अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे पूर्णपणे टाळणे हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
सतर्क रहा. अनपेक्षित लिंक्सवर प्रश्न विचारा. जबाबदारीने डाऊनलोड करा.
महत्त्वाची आठवण — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. phonepe.com डोमेनमधून न आलेल्या PhonePeच्या नावाने आलेल्या कोणत्याही ईमेलकडे दुर्लक्ष करा. फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
