PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

RBI डिजिटल अवेअरनेस वीक : सोशल इंजिनिअरिंग स्कॅम्सबाबत जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

PhonePe Regional|3 min read|10 May, 2021

URL copied to clipboard

12 मार्च 2026 रोजी कंटेन्ट अपडेट केला

सोशल इंजिनिअरिंग स्कॅम्स म्हणजे एक फसवणुकीची क्लिष्ट पद्धत आहे. यात भामटे लोकांना फसवून त्यांच्याकडून संवेदनशील आर्थिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यात बळजबरी किंवा मालवेअरचा वापर केला जात नाही. उलट व्यक्तींना फसवून ते स्वतःहून आपली माहिती शेअर करतील अशी परिस्थिती निर्माण करण्यात येते.

अशा प्रकारच्या फसवणुकीत भामटे तातडीची परिस्थिती निर्माण करतात. अशा वेळी पीडित व्यक्तीला परिस्थिती शांतपणे तपासण्यास वेळ मिळत नाही. “तुमचे खाते ब्लॉक झाले आहे” किंवा “तुमचे सबस्क्रिप्शन संपत आहे” अशा संदेशांसह SMS किंवा ईमेल पाठवून बनावट आपत्कालीन परिस्थिती तयार करण्यात येते. तुम्ही विचार न करता लगेच कृती करावी, असा यामागील उद्देश असा असतो.

सोशल इंजिनिअरिंग स्कॅम्सबाबत आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती आणि त्यापासून सुरक्षित कसे राहता येईल याविषयी या ब्लॉगमध्ये सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले आहे.

सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय?

सोशल इंजिनिअरिंग म्हणजे भामटे तुम्हाला फसवून तुमच्याकडील वैयक्तिक संवेदनशील माहिती उघड करून घेतात किंवा तुमची सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करून घेतात. अशा फसवणुकीत भीती, लालच, सहानुभूती किंवा बनावट ग्राहक सेवा अशा मानसिक दबावाच्या पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे व्यक्तीकडून नकळत चूक घडवून आणली जाते. भामट्यांकडून बँका, सरकारी संस्था किंवा कधी कधी तुमचे ओळखीचे व्यक्ती असल्याचा आव आणून तुमचा विश्वास संपादन करण्यात येतो, जेणेकरून ते तुमची फसवणूक करू शकतील.

सोशल इंजिनिअरिंग फसवणुकीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी फिशिंग ही एक पद्धत आहे. यात भामट्यांकडून ईमेल किंवा टेक्स्ट संदेशांच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. व्हिशिंग किंवा व्हॉईस फिशिंगमध्ये फोन कॉलद्वारे लोकांना फसवले जाते. तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ या पद्धतीत भामट्यांकडून कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आव आणला जातो आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत व्यक्तींना “डिजिटल अरेस्ट”मध्ये असल्याचे सांगून दबाव टाकतात.

सोशल इंजिनिअरिंग कसे कार्य करते?

सामान्यतः सोशल इंजिनिअरिंग फसवणूक खालीलप्रमाणे घडते :

  1. भामटा तुम्हाला फोन करून स्वतःला तुमच्या बँकेचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगतो. खाते व्हेरिफाय करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचा दावा केला जातो. ही प्रक्रिया लगेच पूर्ण न केल्यास तुमच्या खात्यातील बचतीचा ॲक्सेस मिळणार नाही असेही सांगितले जाते.
  2. तुमची खात्री पटल्यावर तो तुमच्या डेबिट कार्डची माहिती विचारतो. यात कार्ड नंबर, पिन आणि CVV यांसारखे तपशील मागितले जातात.
  3. त्यानंतर कथित व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी OTP सांगण्यास सांगितले जाते.
  4. प्रत्यक्षात मात्र तुम्ही OTP दिल्यानंतर भामटा फसवणुकीची अंतिम पायरी पूर्ण करतो आणि तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतो.

कृपया लक्षात ठेवा : खरा ग्राहक सेवा प्रतिनिधी कधीही तुमच्याकडून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पूर्ण तपशील किंवा OTP विचारत नाही. ते नेहमी अधिकृत लँडलाइन क्रमांकावरूनच संपर्क साधतात, मोबाइल क्रमांकावरून नाही. तसेच तुमच्या बँकेच्या अधिकृत डोमेनवरून न आलेल्या ईमेलकडे दुर्लक्ष करावे.

सोशल इंजिनिअरिंगपासून सुरक्षित कसे राहावे

  • SMS किंवा इतर माध्यमांद्वारे मिळणारे OTP, पिन किंवा इतर कोणतेही कोड कधीही शेअर करू नका. तसेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे फक्त रक्कम पाठवण्यासाठीच पिन एंटर करण्यात येतो, रक्कम प्राप्त करण्यासाठी नाही. रिफंड किंवा कॅशबॅक मिळवण्यासाठी कोणी पिन एंटर करण्यास सांगत असेल तर ती फसवणूक आहे.
  • तुमचा अकाउंट नंबर किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डचे तपशील कधीही सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका. समाज माध्यमांवर तक्रार नोंदवत असाल तर तुमचा फोन नंबर किंवा वैयक्तिक माहिती पोस्ट करू नका, कारण अशा गोष्टींकडे भामट्यांचे लक्ष असते.
  • अज्ञात क्रमांकावरून बँकेकडून कॉल आल्याचा दावा करून वैयक्तिक माहिती विचारली जात असेल तर त्या कॉलला प्रतिसाद देऊ नका आणि त्वरित कॉल बंद करा.
  • ईमेल मिळाल्यास पाठवणाऱ्याचा डोमेन तपासा. जर तो [XYZ]@gmail.com किंवा इतर कोणताही सर्वसाधारण डोमेन असेल तर त्या ईमेलकडे दुर्लक्ष करा. बँकांकडून येणारे अधिकृत ईमेल नेहमी सुरक्षित अधिकृत डोमेनवरूनच पाठवले जातात.
  • कधीही तुमची स्क्रीन शेअर करू नका. कोणतीही बँक किंवा सेवा प्रदाता तुम्हाला स्क्रीन शेअर करण्यासाठी ॲप इन्स्टॉल करण्यास किंवा रिमोट ॲक्सेस देण्यास सांगत नाही.
  • कोणतेही सबस्क्रिप्शन मँडेट किंवा ऑटोपे विनंती “अप्रूव्ह” करण्यापूर्वी व्यापाऱ्याचे नाव आणि रक्कम तपासा. तुम्ही सबस्क्रिप्शन सुरू केलेले नसेल तर ती विनंती त्वरित नाकारावी.

सुरक्षितपणे व्यवहार कसे करावे या विषयीचा व्हिडिओ पाहा: https://youtu.be/rHZ57O9X8kk

PhonePe वर रिपोर्ट करणे:

  • PhonePe ॲप: मदत  सेक्शनमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
  • PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग:
  • तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा.

अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:

  • सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम  फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधेद्वारे करा.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading