
Trust & Safety
कॅश ऑन डिलिव्हरी (COD) व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक : सावध कसे राहावे आणि सुरक्षितऑनलाइन खरेदी कशी करावी
momitajaiswal3|5 min read|18 November, 2026
करोनाच्या महासाथीनंतर ई-कॉमर्स क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. या काळात एकीकडे अधिकृत व्यवसायांची संख्या वाढली तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन व्यवहार करण्याबाबत साशंक असलेल्या व्यक्तींमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी (COD) हा पेमेंटचा सोयीस्कर पर्याय लोकप्रिय झाला आहे. मात्र, या पर्यायाचा गैरफायदा घेऊन ग्राहकांची फसवणूक करणारे सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. आपल्या विविध गरजांसाठी ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने या पेमेंट पद्धतीतील संभाव्य धोके आणि सहज लक्षात न येणाऱ्या बाबींबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे झाले आहे.
नेमका प्रकार काय आहे :
वस्तूंची डिलिव्हरी आणि कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ऑर्डर या प्रामुख्याने परस्पर विश्वासावर अवलंबून असतात. नेमक्या याच विश्वासाचा गैरफायदा घेण्यासाठी भामटे या व्यवहारांचा वापर करतात.
अधिकृत कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून किंवा बनावट कंपनीचे नाव आणि लोगो वापरून फसवणूक करणारे तातडीने पेमेंट करण्यासाठी किंवा अकाउंटशी संबंधित संवेदनशील माहिती देण्यासाठी खोटी कारणे सांगतात. घराच्या दारात डिलिव्हरी देणारी व्यक्ती उभी असताना घाईत निर्णय घ्यावा लागतो. त्यात नेहमीप्रमाणेच एखादी वस्तू डिलिव्हरीसाठी आल्याचे दिसत असल्याने संशय येत नाही. अशा परिस्थितीत डिजिटल पेमेंट करताना अत्यंत सावधगिरी बाळगणाऱ्या युजरचीही फसवणूक होऊ शकते.
कॅश ऑन डिलिव्हरी (COD) व्यवहारांमध्ये फसवणूक कशा प्रकारे होते?
या फसवणुकीमागे माणसाच्या मानसशास्त्राचा वापर केला जातो. सोशल इंजिनीअरिंग तंत्राचा वापर करून भामटे तातडीने निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण करतात. ते अशी परिस्थिती निर्माण करतात की, माहितीची खातरजमा करण्यासाठी थोडा जरी वेळ घेतला, तरी मोठे नुकसान होईल, असे संबंधित व्यक्तीला वाटू लागते. आकर्षक ऑफर हातातून निसटण्याची किंवा अपेक्षित पार्सल मिळणार नाही, अशी भीती निर्माण केली जाते. काहीतरी गमावण्याच्या याच भीतीचा गैरफायदा घेऊन लोकांची दिशाभूल केली जाते. या घाईमुळे बहुतेक लोक नेहमीच्या परिस्थितीत करत असलेली सुरक्षेसंबंधी तपासणी टाळतात.
डिलिव्हरी आणि पेमेंटच्या वेळी फसवणूक करण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या काही सामान्य पद्धती पुढीलप्रमाणे आहेत :
1. 1. बनावट COD ऑर्डर आणि फसवणुकीत सहभागी असलेले कुरिअर प्रतिनिधी
तुम्ही ऑर्डर न केलेले ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पार्सल भामटा तुमच्या घरी पाठवतो. रक्कम भरल्याशिवाय पार्सल उघडून किंवा तपासून पाहण्यास कुरिअर प्रतिनिधी परवानगी देत नाही. त्याऐवजी तो तुम्हाला अधिकृत कंपनीचे नाव आणि लोगो असलेला QR कोड देतो. तुम्ही हा कोड स्कॅन करून पैसे भरताच ती रक्कम थेट फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक अकाउंटमध्ये जमा होते. त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या पार्सलमध्ये तुम्ही रकमेच्या मूल्याची वस्तू नसल्याचे लक्षात येते.
2. महागड्या वस्तूंवर मोठ्या सवलती देऊन आगाऊ पैसे उकळणे
महागड्या वस्तू अत्यंत आकर्षक सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भामटे दाखवतात. या ऑफरच्या मोहात पडलेल्या खरेदीदारांना मोठ्या प्रमाणावर वस्तूंची ऑर्डर देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यासाठी आगाऊ पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय दिला जातो. मात्र, पार्सलमध्ये केवळ निरुपयोगी भंगार असते. एकदा रक्कम मिळाल्यानंतर विक्रेता कोणताही मागमूस न ठेवता गायब होतो.
COD व्यवहारांमधील फसवणूक कशी ओळखाल : सावध राहण्यासाठी ही उदाहरणे लक्षात ठेवा!
प्रसंग 1 : ऑर्डर न केलेल्या COD पार्सलद्वारे फसवणूक
सीमा ऑफिसमध्ये कामात व्यग्र असताना एक डिलिव्हरी एजंट तिच्या घरी येतो. त्या वेळी तिची आई घरात एकटीच असते. ती दरवाजा उघडते. पार्सलवरील लेबलवर सीमाचे नाव, फोन नंबर आणि पत्ता अचूक छापलेला असतो. त्यामुळे सीमानेच ही ऑर्डर दिली असावी, असे तिच्या आईला वाटते. ती UPI द्वारे ₹800 भरून पार्सल स्वीकारते. याबाबत सीमाला सांगितल्यानंतर ती आपल्या ऑर्डरची हिस्ट्री तपासते. आपण कोणतीही वस्तू खरेदी केलेली नाही, याची तिला खात्री होते. पार्सल उघडल्यानंतर त्यात कमी किमतीची आणि वापरण्याची मुदत संपलेली सौंदर्यप्रसाधने असल्याचे आढळते.
प्रसंग 2 : मूळ ऑर्डरच्या आधी बनावट पार्सल पाठवून फसवणूक
आरती नियमितपणे ऑनलाइन खरेदी करते. एकदा ती एका अपरिचित ई-कॉमर्स वेबसाइटवरून काही वस्तू खरेदी करते आणि कॅश ऑन डिलिव्हरी (COD) हा पर्याय निवडते. काही दिवसांनी ती ऑफिसमध्ये असताना तिला ‘आउट फॉर डिलिव्हरी’चे नोटिफिकेशन मिळते. त्यानंतर एका अनोळखी कुरिअर सेवेकडून तिला फोन येतो. आरतीला आधीच पैसे भरण्याची सवय असल्याने ती डिलिव्हरी प्रतिनिधीला UPI QR कोड पाठवण्यास सांगते. ती ऑफिसमधूनच पेमेंट करते आणि पार्सल इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे ठेवण्यास सांगते. संध्याकाळी घरी आल्यावर ती पार्सल उघडते. त्यात निरुपयोगी वस्तू असतात आणि ऑर्डरचे बिलही नसते. त्यानंतर ती ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर लॉग इन करते. त्या वेळी तिची मूळ ऑर्डर अद्याप डिलिव्हरीसाठी येत असल्याचे तिच्या लक्षात येते. तिच्या ऑर्डरच्या डिलिव्हरीसंबंधीची माहिती उघड झाली होती किंवा त्या माहितीचा गैरवापर करण्यात आला होता. त्या आधारे तिच्या मूळ ऑर्डरच्या आधी बनावट COD पार्सल पाठवून तिची फसवणूक करण्यात आली होती.
अशा फसवणुकीचे प्रत्यक्षात काय परिणाम होतात?
डिलिव्हरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीमुळे केवळ आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त त्याचे इतरही गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रामुख्याने पुढील तीन प्रकारे नुकसान होऊ शकते.
- थेट आर्थिक नुकसान : स्वस्त बनावट वस्तू, रिकामे बॉक्स किंवा प्रत्यक्षात कधीही न मिळणाऱ्या डिजिटल सेवांसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.
- अकाउंटची सुरक्षितता धोक्यात येणे : फसवणूक करणाऱ्यांनी तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग कोड डायल करण्यास किंवा OTP शेअर करण्यास प्रवृत्त केले, तर ते तुमच्या मुख्य मोबाइल नंबरवरील कॉल आपल्या ताब्यात घेऊ शकतात. तसेच, तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट आणि बँकिंग ॲपचा ताबा मिळवून आणखी आर्थिक फसवणूक करू शकतात.
- डिजिटल व्यवहारांवरील विश्वास कमी होणे : क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये रक्कम परत मिळवण्यासाठी चार्जबॅकची सुविधा उपलब्ध असते. मात्र, UPI द्वारे केलेले पेमेंट तात्काळ पूर्ण होते. एकदा तुमच्या अकाउंटमधून रक्कम गेल्यानंतर ती परत मिळवणे अत्यंत कठीण असते. अशा अनुभवांमुळे डिजिटल पेमेंटमधील सोयीबरोबरच त्याबाबत असलेली सुरक्षिततेची भावनाही कमी होते.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी फोनपेसारख्या प्लॅटफॉर्मतर्फे अधिक धोका असलेले म्हणून नोंदवलेले मोबाइल नंबर किंवा व्यापाऱ्याच्या नावातील विसंगती यांसारख्या सुरक्षेसंबंधीच्या सूचना दाखवण्यात येतात. मात्र, युजरने व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी थांबून या सूचना वाचल्या, तरच त्यांचा उपयोग होऊ शकतो.
फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे कराल आणि एक पाऊल पुढे कसे राहाल?
सुरक्षित राहण्यासाठी ऑनलाइन खरेदीची सोय सोडून देण्याची गरज नाही. काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे पैसे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवता येऊ शकते.
- घाई करण्यासाठी दबाव आणला जात असल्यास सावध व्हा. डिलिव्हरी प्रतिनिधी किंवा ‘सपोर्ट एजंट’ने ताबडतोब पैसे भरण्याचा आग्रह धरला किंवा पैसे न भरल्यास दंड आकारला जाईल, असे सांगितले, तर थांबा. घाईत निर्णय घ्यायला लावणे हे फसवणूक करणाऱ्यांचे सर्वात प्रभावी हत्यार आहे.
- डिलिव्हरीची माहिती नेहमी तपासा. वस्तू पाठवल्याची माहिती वेबसाइटवर तपासा आणि डिलिव्हरीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत व खात्रीशीर माध्यमांचाच वापर करा.
- COD संबंधीच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही ऑर्डर दिलेली नसतानाही COD संबंधीचा मेसेज आल्यास त्याची तातडीने तक्रार करा. तुमच्या माहितीचा गैरवापर झालेला असू शकतो.
- COD पेमेंट करण्यापूर्वी पार्सल तपासा. प्रत्यक्ष पार्सल हातात मिळाल्याशिवाय आणि त्यातील वस्तू तपासल्याशिवाय कॅश ऑन डिलिव्हरीचे पेमेंट करू नका.
- पैसे स्वीकारणाऱ्याचे नाव तपासा. ‘पे’ (‘Pay’) या पर्यायावर क्लिक करण्यापूर्वी पेमेंटच्या कन्फर्मेशन स्क्रीनवरील नाव तपासा. पैसे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या पडताळणी न झालेल्या वैयक्तिक UPI आयडीवर जात नसून अधिकृतरीत्या नोंदणीकृत कंपनीच्या अकाउंटमध्ये जात असल्याची खात्री करा.
- ॲपवरील सुरक्षेसंबंधीच्या सूचनांकडे लक्ष द्या. ॲपमध्ये दिसणाऱ्या सुरक्षेसंबंधीच्या पॉप-अप सूचना किंवा पडताळणी न झालेल्या अथवा अधिक धोका असलेल्या पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तींबाबतच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे बँकिंग ॲप विशिष्ट कारणांमुळेच असे इशारे देत असते.
- मोठ्या रकमेच्या व्यवहारांची स्वतंत्रपणे खातरजमा करा. तुम्ही मोठी रक्कम पाठवत असाल, तर चॅट विंडोमधून बाहेर पडा. पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा तपशील आणि रक्कम स्वतंत्रपणे पुन्हा तपासा.
- अपरिचित वेबसाइटवरून खरेदी करताना विशेष सावधगिरी बाळगा. विशेषतः विश्वासार्हतेचे रेटिंग कमी असलेल्या वेबसाइटबाबत अधिक काळजी घ्या. वेबसाइटचे नाव सर्च करून किंवा त्याबद्दलचे रिव्ह्यू वाचून तिची विश्वासार्हता तपासता येते.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुम्हाला लक्ष्य केले गेले आहे, तर त्वरित याची तक्रार नोंदवा. यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.
PhonePe वर रिपोर्ट करणे:
- PhonePe ग्राहक सेवा: 080-68727374 / 022-68727374 या क्रमांकांवर कॉल करा.
- लॉगिन संबंधित समस्या: https://support.phonepe.com/ द्वारे तिकीट दाखल करा.
- सोशल मीडिया रिपोर्टिंग:
- Twitter: PhonePe Support
- Facebook: PhonePe Official
- तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा..
अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:
- सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
- दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधे द्वारे करा.
महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
Author
