PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

नवीन लाभार्थ्यांना पैसे पाठवताना होणारे धोके समजून घ्या

PhonePe Regional|3 min read|17 September, 2026

URL copied to clipboard

कल्पना करा की तुम्ही सोशल मीडियावर घरगुती वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या एका ग्रुपचे सदस्य आहात. तुम्ही ग्रुपवर पोस्ट टाकली की तुम्हाला पलंग हवा आहे. काही मिनिटांतच, त्या ग्रुपचा भाग नसलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा तुम्हाला मेसेज येतो. ते म्हणतात की त्यांच्याकडे तुमच्या गरजेनुसार अगदी तसाच पलंग उपलब्ध आहे. ते तुम्हाला कॉल करतात आणि ‘इतर ग्राहकही उत्सुक आहेत’ असे सांगून त्वरित ॲडव्हान्स पैसे भरण्याचा आग्रह धरतात. तुम्ही त्यांच्याशी बोलणी करता आणि अर्धी रक्कम आधी व उर्वरित रक्कम पलंग मिळाल्यावर देण्याचे ठरवता. ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक नंबर शेअर करतात. जेव्हा तुम्ही PhonePe वरून पैसे पाठवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ॲप तुम्हाला इशारा देतो; पण तरीही तुम्ही त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पैसे पाठवून देता.

अशा किंवा यासारख्या परिस्थितीत काय चुकीचे घडू शकते?

आपण अनेकदा नवीन लाभार्थ्यांना (न्यू बेनेफिशिअरी) पैसे ट्रान्सफर करतो. नवीन व्यवहार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे समजून घेतल्यास, तुम्ही संभाव्य सायबर फ्रॉडपासून सावध राहू शकाल आणि तुमचा डिजिटल पेमेंटचा प्रवास सुरक्षित ठेवू शकाल.

हा घोटाळा कसा काम करतो: घाईगडबड आणि भीतीचा गैरफायदा

  • बनावट घाई निर्माण करणे: स्कॅमर्स (भामटे) बनावट आणीबाणीची परिस्थिती निर्माण करतात. ऑफर संपणार आहे, सर्व्हिस स्लॉट रद्द होईल किंवा तातडीचा रिफंड आहे, असे सांगून तुम्हाला जाळ्यात ओढतात. हा वेळेचा दबाव तुम्हाला विचार न करता घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडतो.
  • ॲपमधील सुरक्षितता इशाऱ्यांकडे दुर्लक्ष: घाईघाईत ट्रान्सफर पूर्ण करण्याच्या नादात युझर्स बहुधा त्यांच्या नैसर्गिक तार्किक विचारांकडे आणि PhonePe ॲपवरील महत्त्वाच्या सुरक्षा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात.
  • अनव्हॅरीफाइड विक्रेत्यांकडून आगाऊ पैशांची मागणी: इन्स्टाग्राम, टेलिग्राम किंवा इतर सोशल ॲप्सवरील अनव्हॅरीफाइड विक्रेते सामान किंवा सेवा देण्यापूर्वी पूर्ण पैसे देण्याचा आग्रह धरतात. एकदा पैसे मिळाले की, कोणतीही जबाबदारी न घेता ते गायब होतात.

एका छोट्या चुकीचा मोठा परिणाम

  • इन्स्टंट पेमेंट्स: आपले आर्थिक नुकसान टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा तुम्ही UPI पिन टाकून ट्रान्सफर पूर्ण केले की पैसे त्वरित पाठवले जातात. हे पैसे परत मिळवणे अत्यंत क्लिष्ट किंवा काही प्रकरणांमध्ये अशक्यही असू शकते.
  • आर्थिक नुकसान: अस्तित्वात नसलेल्या सेवा, बनावट वस्तू किंवा खोट्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे गमावणे अत्यंत मनस्तापदायक असते, कारण यामध्ये चार्जबॅक मिळण्याची कोणतीही हमी नसते.

सुरक्षित व्यवहारांसाठी व्यावहारिक नियम

  • अतिघाई म्हणजे धोक्याची घंटा: अधिकृत व्यावसायिक किंवा विश्वासू व्यक्ती तुम्हाला खात्री करण्यासाठी वेळ न देता लगेच पैसे पाठवण्याचा आग्रह कधीही धरणार नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची अतिघाई ही पहिली धोक्याची सूचना समजा.
  • 2. प्रत्येक वेळी नाव तपासून घ्या: ‘पे’ वर क्लिक करण्यापूर्वी स्क्रीनवर दिसणारे नोंदणीकृत नाव काळजीपूर्वक पहा. जर ते नाव तुम्ही ज्या व्यक्तीला किंवा व्यवसायाला पैसे पाठवत आहात त्याशी जुळत नसेल, तर लगेच तो व्यवहार रद्द करा.
  •  मानवी चुका आणि टायपिंगच्या चुका टाळा: पहिल्यांदा पैसे पाठवताना सर्व तपशील पुन्हा एकदा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण UPI द्वारे झालेले व्यवहार तात्काळ पूर्ण होतात आणि ते उलटवता येत नाहीत
  • पैसे मिळवण्यासाठी पिनची गरज नसते: एक साधा आणि महत्त्वाचा नियम – खात्यात पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कधीही QR कोड स्कॅन करावा लागत नाही, UPI पिन टाकावा लागत नाही किंवा OTP शेअर करावा लागत नाही.
  • ॲपमधील पॉप-अप्स आणि सूचनांकडे कधीही दुर्लक्ष करू नका: जर तुमच्या पेमेंट ॲपने एखाद्या खात्याला हाय-रिस्क किंवा नवीन तयार केलेले खाते म्हणून फ्लॅग केले असेल, तर लगेच थांबा आणि खात्री करा. PhonePe सारखे ॲप्स हाय-रिस्क नंबर, स्पॅम टॅग किंवा नवीन खात्यांसाठी स्क्रीनवर पॉप-अप वॉर्निंग दाखवतात.
  • पहिल्यांदा व्यवहार करताना कधीही पूर्ण रक्कम पाठवू नका: पहिल्यांदा पेमेंट करताना नेहमी टप्प्याटप्प्याने पैसे देणे, डिलिव्हरीवर पैसे देणे किंवा स्पष्ट ग्राहक संरक्षण धोरण असलेल्या अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करा.

कोणत्याही संशयास्पद व्यवहारात सुरुवातीपासूनच धोक्याचे स्पष्ट संकेत मिळतात – गरज आहे ती फक्त योग्य माहिती बाळगण्याची आणि पुढे काय करावे हे जाणून घेण्याची!

फसवणूक झाल्यास काय करावे?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुम्हाला लक्ष्य केले गेले आहे, तर त्वरित याची तक्रार नोंदवा. यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.

PhonePe वर रिपोर्ट करणे:

  • PhonePe ग्राहक सेवा: 080-68727374 / 022-68727374 या क्रमांकांवर कॉल करा.
  • लॉगिन संबंधित समस्या: https://support.phonepe.com/ द्वारे तिकीट दाखल करा.
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग:
  • तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा..

अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:

  • सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम  फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधे द्वारे करा.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading